लाखेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर; कृषिमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारींचे होणार निराकरण.
जमीन, ७/१२ दुरुस्तीपासून पीएम किसानपर्यंत सर्व सेवा एका छताखाली.

इंदापूर (प्रतिनिधी) : इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नागरिकांच्या महसूल व शासकीय योजनांशी संबंधित विविध समस्या सोडवण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती नूतन लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर यांनी दिली.
या शिबिरा बाबत श्रीमंत ढोले सर यांनी माहिती दिली की,” शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुका दुरुस्ती, डिजिटल ७/१२ व ८अ उताऱ्यांचे वाटप, तुकडेबंदी नियमन, जमीन वर्ग-२ ते वर्ग-१ प्रकरणे तसेच भूसंपादन कमी-जास्त पत्रक तयार करणे आदी महसूल विभागाशी संबंधित कामे करण्यात येणार आहेत.
यासोबतच लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी/अधिवास प्रमाणपत्र आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच सामाजिक लाभाच्या योजनांमध्ये संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी योजना याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
एक खिडकी योजनेअंतर्गत ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान योजनेची माहिती व तक्रार निवारणाची सुविधा नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर यांनी केले आहे.हे शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे, लाखेवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे १४ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामुळे अनेक शेतकऱ्यांची व गावकऱ्यांची महसूल व शासकीय कामे जी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती, ती आता थेट गावातच येऊन सोडवली जाणार आहेत. यामुळे नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी वारंवार फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही, तसेच वेळ व खर्चाचीही मोठी बचत होणार आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी गावपातळीवर अशा प्रकारचे समाधान शिबिर आयोजित केल्याबद्दल शेतकरी व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात असून, या उपक्रमाचे स्वागतही करण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यापूर्वी इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली या ठिकाणी सदरचे शिबिर आयोजित केले होते त्यास चांगला प्रतिसाद मिळाला असून शेकडो शेतकरी व नागरिकांच्या अडीअडचणी दूर झाल्याचे पाहायला मिळाले होते.



