तब्बल 150 पोलिसांच्या छायेत होणार जमीन मोजणी; धरणग्रस्त शेतकरी आक्रमक! इंदापूरमध्ये उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश.
18 मे रोजी भव्य जनआक्रोश मोर्चाची घोषणा.

इंदापूर, (दि.16 मे )— महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख मा. संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काल उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत इंदापूर तहसील कार्यालयावर महत्त्वपूर्ण बैठक व निवेदन कार्यक्रम पार पडला. यावेळी मा. जीवन बनसोडे साहेब, तहसीलदार इंदापूर यांना दि.18 मे 2026 रोजी भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले.
उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या मते, दि.21 मे व दि.22 मे 2026 रोजी मौजे हिगणगांव व मौजे तरटगांव येथील संपादित जमिनींची मोजणी व ताबा प्रक्रिया प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. यासाठी साधारण 150 पोलीस कर्मचारी तैनात करून शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारने JW Global Group या कंपनीसोबत करार करून संबंधित जमिनी कंपनीच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मूळ जमीनधारक शेतकऱ्यांना कोणतीही अधिकृत माहिती किंवा पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली असून आता आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मा. संजय भैय्या सोनवणे यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, “शेतकऱ्यांवर अन्याय करून कोणत्याही कंपनीला जमीन देण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”
तहसीलदार मा. जीवन बनसोडे यांनी शेतकऱ्यांचे निवेदन तत्काळ मा. जिल्हाधिकारी, पुणे यांना ई-मेलद्वारे पाठविले. त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये सर्व शेतकरी प्रतिनिधींसोबत आगामी मोर्चा व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दि.18 मे रोजी होणाऱ्या या जनआक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येने धरणग्रस्त शेतकरी सहभागी होणार असून प्रशासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



