अंथुर्णे येथे नीरा नदी जलकलश पूजन; ‘गोदा ते नर्मदा जलयात्रे’ला जनसहभागाचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Pune (इंदापूर):-इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे नीरा नदीच्या जलकलशाचे पूजन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज बापू जाचक, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंचक्रोशीतील शेतकरी, स्थानिक नागरिक तसेच शाळकरी मुले-मुलींचा मोठा सहभाग या वेळी पाहायला मिळाला.कार्यक्रमादरम्यान जलकलशाचे विधिवत पूजन करून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नीरा नदीच्या पाण्याच्या कलशाचे हस्तांतरण पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांच्याकडे केले. यावेळी निमगाव उपविभागाचे उपविभागीय अभियंता दशरथ एकतपुरे, शाखाधिकारी झगडे, अंथुर्णेचे शाखाधिकारी ननवरे तसेच विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमाचा संबंध लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “गोदावरी ते नर्मदा जलयात्रा” या राज्यस्तरीय अभियानाशी आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ही जलयात्रा राबविण्यात येत असून राज्यभरातून नद्यांचे पवित्र जल एकत्र करून जलसंवर्धनाचा संदेश देण्यात येत आहे.
यावेळी बोलताना कृषिमंत्री भरणे यांनी पाण्याचे महत्त्व अधोरेखित करत जलसंवर्धन ही केवळ सरकारी योजना नसून ती लोकचळवळ बनविण्याची गरज असल्याचे सांगितले. “पाणी वाचवा, पर्यावरण जपा” हा संदेश प्रत्येक नागरिकाने अंगीकारला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच वृक्षलागवड, जंगल संवर्धन, सुपोषित माती व समृद्ध शेती यांसारख्या उपक्रमांद्वारे जलसंपदा टिकवून ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या जलयात्रेच्या माध्यमातून जनसहभागातून जलसंवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि प्रदूषण टाळण्याचा व्यापक संदेश दिला जात आहे. अंथुर्णे येथील कार्यक्रमाने या अभियानाला बळ मिळाले असून नागरिकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद देत जलसंवर्धनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले आहे.



