नगरसेविका सदफ बागवान यांच्या पुढाकारातून पंढरपूरच्या भाविकांसाठी अन्नदान उपक्रम..पंढरपूरच्या हरिनाम सप्ताहासाठी इंदापूरकरांचा सेवाभाव.

इंदापूर : वारकरी संप्रदायातील सेवा, समर्पण आणि भक्तीची परंपरा जपत इंदापूर शहरातून पंढरपूरच्या हरिनाम सप्ताहासाठी अन्नदानाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित श्री संत नामदेव महाराज व संत जनाबाई यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यासाठी इंदापूरमधील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भक्तीभावाने अन्नदान पाठविले.
लोकनेते प्रदीप गारटकर यांच्या आवाहनानुसार संपूर्ण इंदापूरसह प्रभाग क्रमांक ७ मधील इंदापूर नगरपरिषदेच्या कार्यक्षम नगरसेविका सदफ वसिम बागवान यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला.
या सेवाकार्यात स्वतः सदफ बागवान यांनी महिलांसमवेत भाकरी तयार करण्याचे नियोजन केले. व्यंकटेश नगर परिसरातील नागरिकांनीही घराघरातून सहभाग घेत अन्नदानासाठी मोठ्या श्रद्धेने सहकार्य केले. तसेच समस्त व्यंकटेश भक्तगण मंडळाच्या वतीनेही देणगी व अन्नसाहित्य संकलित करून पंढरपूर येथे पाठविण्यात आले.
भक्तीच्या माध्यमातून समाजात एकोप्याचा आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.



